Posted in Uncategorized

Marathi Bhasha Din… 2

“Kavi Kusumagraj”

Today is the Birthday of a great Marathi poet, “Kusumagraj”. His contribution to the language as well as the literature has been so big, that his birthday is celebrated as “Marathi Language Day”. As a tribute to this towering personality of his field, I dedicate my post to him, and next what you all read is the language itself, Marathi.

आज मराठी भाषा दिवस आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा आज वाढदिवस. त्यांना 1987 सालाचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला. त्यांचा गौरव करण्यासाठी, सरकार ने त्यांचा वाढदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवलं. आज त्यांचीच, एक मला आवडणारी, कृती तूम्हां सर्वां बरोबर सामायिक करतो. 1952 साली लिहीलेली ही कविता, आजही वाचकाला प्रेरित करते.

कणा

ओळखलत का सर मला?’ पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी.

क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून, ‘गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन’.

माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली.

भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले, प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले.

कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे.

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला ‘पैसे नकोत सर’, जरा एकटेपणा वाटला.

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा!

किती समकालीन वाटते ना ही कविता! अनेकानेक कृति मराठी भाषेला देणारे कवि कुसुमाग्रज ह्यांना फक्त आपण नमस्कार करू शकतो.

आजच्या दिवशी कवी सुरेश भट यांची कविता वाचणे हे ही आपले सौभाग्य.

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी

आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी

अशा सर्व माय मराठीला जीवंत ठेवण्याचा प्रयत्न करणारे जे कोणी जाणते – अजाणते व्यक्ती आहेत त्यांना नमस्कार करतो.

नमस्कार.

Author:

Am a teacher by profession. A student of History and international politics. Believe that Bhakti (Devotion) and Humanism can only save Humanity. Revere all creation. My thoughts are influenced by His Holiness Pandurang Shashtriji Athavale